Wednesday, 2 March 2016

SANT DNYANESHWAR.......

संत ज्ञानेश्वर (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवीभागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते..भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभावचांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचनाअध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तुत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [१]
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि ज्ञानेश्वरांनी तेथे आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.
भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
"ज्ञानेश्‍वरीचे पारायण करणे हा संस्कार आहे, तर प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून घेणे हा जीवनाच्या उदात्ततेचा भाग आहे. अशा अर्थ समजावून घेण्याला एक प्रकारचे वजन असते आणि त्यातून जीवनाची परिपूर्णताही साध्य होते. कारण मला काय कळते, यावर त्या पदार्थाचे अस्तित्व स्वीकारावे की नाही हे ठरते. म्हणूनच डोळ्यांना दिसते त्यापेक्षाही त्या वस्तूचे अस्तित्व समजणे आवश्‍यक असते."
"ज्ञानेश्‍वरीचा अर्थ कळत नसला तरी ती वाचावी. कारण, ती वाचल्याने जो भाव तयार होतो, त्या भावाला भुलते ती ज्ञानेश्‍वरी माऊली... आणि मग आपल्या भक्ताला अर्थ समजून देण्याची जबाबदारीही माऊली घेते. संतवाङ्‌मय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकवते. आपल्या आयुष्याला विशिष्ट क्रमाने जगण्याची जी पद्धत आवश्‍यक असते, ती संतवाङ्‌मय सांगते. म्हणून संतवाङ्‌मयाची कास सोडू नये."